म्हसवड पोलिसांची अवघ्या दोन तासांत प्रभावी गुन्हे उकल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) :
म्हसवड पोलिसांनी पुन्हा एकदा त्यांच्या गुन्हे उकल कौशल्याचा ठसा उमटवत अवघ्या दोन तासांत मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास उलगडला आहे. घरातील महिला एकट्या असल्याचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करून व पाठलाग करून रंगेहात ताब्यात घेतले.

महिला तक्रारदार रेखा निंबाळकर या किचनमध्ये भांडी घासत असताना त्यांच्या घरातून चार्जिंगला लावलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवला. याबाबत तक्रारदारांनी तात्काळ डायल 112 या मदत क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांत तक्रार दिली. मोबाईलमध्ये महत्त्वाचा डाटा असल्याने तक्रार गांभीर्याने घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तातडीने तपास सुरू केला.

सदर मोबाईल स्विच ऑफ न केल्याने त्याचे लोकेशन मिळाले. त्यावरून पोलिसांनी संशयिताचा माग काढत पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत आरोपीचे नाव विठ्ठल सदाशिव कलढोणे (रा. राऊतवाडी, म्हसवड) असे समोर आले. चोरी केलेला मोबाईल विक्रीसाठी नेत असतानाच आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.

या कारवाईत अवघ्या दोन तासांत मोबाईल हस्तगत करून तक्रारदारास परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. या घटनेतून नागरिकांना ‘डायल 112’ वर तात्काळ संपर्क साधल्यास पोलिस मदतीस तत्पर धावून येतात याची जनजागृतीही झाली आहे.

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, रूपाली फडतरे, मैना हांगे, नीता पळे, अभिजीत भादुले, विकास ओंबासे आणि होमगार्ड महेश खाडे यांनी विशेष भूमिका बजावली.

👉 म्हसवड पोलिसांच्या तातडीच्या व प्रभावी कारवाईमुळे चोरीस गेलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने तक्रारदार व नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *