जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची सैनिक फेडरेशनच्या शिष्टमंडळासोबत बैठक — संरक्षण समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश
व्हिजम २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सातारा, प्रतिनिधी —
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. तुषार दोषी यांची भेट सैनिक फेडरेशन व माजी सैनिकांच्या शिष्टमंडळाने घेतली. या भेटीत शहीद जवानांचे कुटुंबीय, माजी सैनिक व त्यांचे परिवार यांच्या पोलीस विभागाशी संबंधित प्रलंबित समस्यांबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
शिष्टमंडळाने यावेळी सांगितले की, यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा संरक्षण समितीची मासिक बैठक नियमितपणे घेण्यात येत होती. या बैठकीस जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच सर्व तालुक्यांतील माजी सैनिक प्रतिनिधी उपस्थित राहत होते. या बैठकीत विविध समस्या मांडल्या जात होत्या व तातडीने त्या सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात होत्या. यामुळे जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सुटण्यास मदत होत होती.
याच अनुषंगाने, सद्य परिस्थितीतही अशाच प्रकारची मासिक बैठक आपल्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात यावी, अशी विनंती शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना केली. श्री. तुषार दोषी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ जिल्हा संरक्षण समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले.
या शिष्टमंडळात श्री. प्रशांत कदम (माजी सैनिक) – उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य; श्री. संजय निंबाळकर – अध्यक्ष, सातारा तालुका सैनिक फेडरेशन; आणि श्री. प्रवीण शिंदे – उपाध्यक्ष, सातारा तालुका सैनिक फेडरेशन यांचा समावेश होता.

