फलटणमध्ये स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांसाठी BIS तर्फे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम
व्हिजन २४ तास न्यूज
फलटण :प्रतिनिधी
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने फलटण नगर परिषद अंतर्गत आत्मनिर्भर शहर स्तर संघ येथे भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards – BIS) यांच्या मार्फत स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांसाठी जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना गुणवत्ता, सुरक्षितता व प्रमाणित उत्पादनांविषयी माहिती देणे, तसेच त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि दैनंदिन वापरातील वस्तूंविषयी जागरूक करणे हा होता. कार्यक्रमामध्ये खेळण्यांची सुरक्षितता, इलेक्ट्रिक खेळणी, बालकांचे पोषण, भारतीय मानके व अन्न भेसळ, फीडिंग बाटल्यांचा सुरक्षित वापर, कचरा वर्गीकरण व बायोगॅस, मासिक स्वच्छता व बाल संगोपन, वैद्यकीय वस्त्र उत्पादने व आरोग्य, तसेच स्वयंपाकघरातील भांडी, प्रेशर कुकर, गॅस स्टोव्ह, मातीची भांडी व फ्रीज यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान महिलांना सुरक्षित व प्रमाणित उत्पादने कशी ओळखावीत, अन्नातील भेसळ कशी तपासावी, तसेच स्वच्छता व आरोग्यदायी सवयी कशा अंगीकाराव्यात याबाबत माहिती देण्यात आली. महिलांनी स्वतःबरोबरच समाजामध्येही जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भारतीय मानक ब्युरो, पुणे येथून रिसोर्स पर्सन सौ. मेघना रोंगे मॅडम व सौ. रसिका पुरंदरे मॅडम उपस्थित राहून त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रणरागिणी संस्थेच्या वतीने संचालिका तथा मुख्याध्यापिका श्रीमती शाहीन शेख, सौ. राझिया शेख, सचिव श्री. मारुती टकले, हिना सय्यद, अनिसा सय्यद, तसेच नगरपालिकेचे श्री. शिरतोडे सर, सौ. विद्या रिठे, सुप्रिया फडतरे, सौ. सोनल आंबोळे व सौ. रेश्मा कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना नाश्ता व भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आणि सुरक्षित जीवनशैली अंगीकारण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

