३५ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘असेन मी.. नसेन मी…’ नाटकाला प्रथम पारितोषिक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

गणेश तळेकर
मुंबई,  : प्रतिनिधी

३५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स या संस्थेच्या ‘असेन मी.. नसेन मी…’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला रु. ७.५० लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

द्वितीय पारितोषिक ‘वरवरचे वधुवर’ (कलाकारखाना आणि शांताई संस्था) नाटकाला मिळाले असून त्यास रु. ४.५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले. तृतीय पारितोषिक सुमुख चित्र प्रस्तुत ‘उर्मिलायन’ या नाटकाने मिळवले असून त्याला रु. ३ लाखाचे पारितोषिक प्राप्त झाले.

इतर प्रमुख विभागांतील पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :

दिग्दर्शन: अमृता सुभाष (असेन मी.. नसेन मी…) – प्रथम पारितोषिक

नाट्यलेखन: संदेश कुलकर्णी (असेन मी.. नसेन मी…) – प्रथम पारितोषिक

नेपथ्य व प्रकाश योजना: प्रदीप मुळ्ये यांना अनुक्रमे ‘असेन मी.. नसेन मी…’ आणि ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकांसाठी प्रथम पुरस्कार

संगीत दिग्दर्शन: निषाद गोलांबरे (वरवरचे वधुवर) – प्रथम पारितोषिक

वेशभूषा व रंगभूषा: मयुरा रानडे (गोष्ट संयुक्त मानापमानाची) आणि उदयराज तांगडी (उर्मिलायन) – प्रथम पारितोषिक

उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक (रु.५०,०००/-) :
पुरुष: प्रशांत दामले, ऋषिकेश शेलार, आनंद इंगळे, सुव्रत जोशी, ओंकार राऊत
स्त्रिया: नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले, निहारिका राजदत्त, सखी गोखले, शर्मिला शिंदे

६ मे ते १६ मे या कालावधीत छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, दादर येथे ही अंतिम फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये १० नाट्यसंस्थांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून विजय गोखले, संजय डहाळे, मिलिंद शिंदे, आशा शेलार व लीना भागवत यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!