कृष्णा नदीच्या पात्रात अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून खळबळ
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते :प्रतिनिधी
शिवडे, ता. कराड
कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात आज दुपारी सुमारास एका अनोळखी महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पांडुरंग मधुकर धर्माधिकारी (वय ३८, रा. शिवडे) हे दुपारी २ वाजता शेतामध्ये जात असताना स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांकडून त्यांना माहिती मिळाली की, मदन माळी यांच्या घासगवताच्या शेतात कृष्णा नदीच्या काठावर एक महिलेचा मृतदेह दिसून येत आहे. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, अंदाजे २५ ते ३५ वयोगटातील एका महिलेचा सडलेला व आळ्या पडलेला मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना देण्यात आली असून, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अद्यापही संबंधित महिलेची ओळख पटलेली नाही.
सदर महिलेच्या अंगावर निळ्या रंगाची पांढऱ्या चौकटीची साडी, हातात हिरव्या व पिवळ्या धातूच्या बांगड्या होत्या. मृत महिलेची उंची सुमारे ५ फूट १ इंच असून बांधा सडपातळ व वर्ण गोरा आहे. मृतदेह पूर्णतः कुजलेला असल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.
पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, संबंधित महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास उंब्रज पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.