मासाळवाडी म्हसवड येथे तलाठी कार्यालय व रस्त्याच्या विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात
व्हजिन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (ता. माण) :
ग्रामविकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा गाठत मासाळवाडी म्हसवड येथे नव्याने मंजूर झालेल्या तलाठी कार्यालयाचे तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
माननीय मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नांमुळे तलाठी कार्यालयाची मंजूरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तलाठी सजा वेगळा केल्यानंतर त्या सजाचे कामकाज मासाळवाडी येथून सुरू व्हावे, यासाठी ग्रामस्थांची दीर्घकालीन मागणी होती. याचे फलित म्हणून आज हे कार्यालय प्रत्यक्षात आकाराला येत आहे.
भूमिपूजन कार्यक्रमात तलाठी कार्यालय संघटनेचे अध्यक्ष व भाऊंचे शासकीय स्वीय सहाय्यक श्री. गुलाब उगालमोगले, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी भाऊ, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ अभियानाचे माण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, म्हसवड सजाचे तलाठी अधिकारी, माजी नगराध्यक्ष व मासाळवाडीचे सुपुत्र डॉ. वसंत मासाळ, माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ, श्री. सुखदेव मासाळ, शिवाजी मासाळ, ॲड. देविदास मासाळ तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या मनात जयकुमार गोरे भाऊ व वहिनी साहेबांविषयी अढळ प्रेम व निष्ठा आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मासाळवाडीतील नागरिकांनी गोरे भाऊंना विक्रमी ७०० मतांचे मताधिक्य दिले होते. याच कृतज्ञतेचा प्रत्यय आज भाऊंनी विकासकामांच्या माध्यमातून दिला.
आजच्या कार्यक्रमात तलाठी कार्यालयासोबतच डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन झाले असून लवकरच मासाळवाडी म्हसवड मुख्य रस्त्याचे डांबरीकरण देखील सुरू होणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या जीहे-कठापूर योजनेतील पाणी मासाळवाडीच्या तलावात सोडण्याची योजना प्रस्तावित असून, लवकरच त्यावरही सकारात्मक पाऊल उचलले जाईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
या भूमिपूजन सोहळ्यामुळे मासाळवाडीच्या विकासाला एक नवीन दिशा मिळाली असून, येत्या काळात ही गती आणखी वाढेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.