उंब्रज येथे ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

श्रीकांत जाधव
उंब्रज, ता. कराड –

उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त ‘एकनाथ हिरक आरोग्य वर्ष’ अंतर्गत सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी सौभाग्य मंगल कार्यालय, कॉलेज रोड, उंब्रज येथे मोफत महाआरोग्य तपासणी, औषधोपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन श्रीशिवयोध्दा प्रतिष्ठाण, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व गांधी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर होत असून, संपूर्ण महाराष्ट्रात अशाच मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, मोफत चष्मा वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर तसेच दिव्यांग बांधवांना मोफत कृत्रिम हात-पाय व कॅलीपर्सचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय, रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

या महाआरोग्य शिबिराला पर्यटन व खनिजकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राम राऊत, गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

श्रीशिवयोध्दा प्रतिष्ठाण, उंब्रज यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील नागरिकांना या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!