अर्धापूरच्या जि.प. हायस्कूलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; ७०० विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
व्हिजन २४ तास न्यूज
उद्धव सरोदे
अर्धापूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पी.एम.श्री जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर येथे महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत संगीत रजनी व समाजप्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीबाई मागासवर्गीय महिला मंडळ, बहादरपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचा जवळपास ७०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक डॉ. शेख एम. डब्ल्यू. एच. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर मांजरमकर सर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांसह महात्मा गांधी व्यसनमुक्ती अभियानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
संगीत रजनीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. तंबाखू, सिगारेट, बिडी, गुटखा, विविध तंबाखूजन्य पदार्थ, गांजा व दारू यांसारख्या व्यसनांमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असून, व्यसनाधीनतेमुळे कुटुंब व समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. ‘निरोगी युवा, सशक्त भारत’ या संकल्पनेतून व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देत विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली.
शाहीर बापूराव जमदाडे, ढोलकीवादक प्रवीण सोनकांबळे, ऑर्गनवादक किशन मंत्री, शाहीर विलास ढवळे, झांजवादक दत्ता सोनकांबळे व रिंगवादक राजाराम सरोदे या कलाकारांनी देशभक्तीपर तसेच व्यसनमुक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. ‘तंबाखू, सिगारेट, दारू, पुड्या, या नशेनं होईल हानी तनाची…’ तसेच ‘तंबाखू, गुटखा बंद करा’ अशा संदेशपर गीतांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती निर्माण केली.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच शहरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक डॉ. शेख एम. डब्ल्यू. एच. यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमातून अर्धापूर शहर व परिसरात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला.

