पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा मागे घ्या म्हसवड पत्रकार संघटनेचे पोलिसांना निवेदन; माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी :

ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे युवा व डॅशिंग टीव्ही पत्रकार मंदार गोंजारी यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी म्हसवड पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांना देण्यात आले.

पत्रकार गोंजारी हे वार्तांकनासाठी पुणे येथील सीओईपी महाविद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. या प्रकाराची माहिती महाविद्यालय प्रशासनाला मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पत्रकार गोंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आकसापोटी करण्यात आल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे.

यावेळी जेष्ठ पत्रकार विजय टाकणे, एल. के. सरतापे, पोपट बनसोडे, सचिन मंगरुळे, नागनाथ डोंबे, अनिल पिसे, शहाजी लोखंडे, सचिन सरतापे, अजित काटकर, धनंजय पानसांडे, अहमद मुल्ला, महेश कांबळे आदी पत्रकार उपस्थित होते.

सपोनि संदिप पोमण यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान पत्रकार एल. के. सरतापे यांनी सांगितले की, पत्रकार मंदार गोंजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून तटस्थ आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आहेत. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर सकारात्मक सुधारणा करण्याऐवजी पत्रकारावरच गुन्हा दाखल होणे ही माध्यम स्वातंत्र्याच्या दृष्टीने गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे.

पत्रकाराने केलेले वार्तांकन आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे हा पत्रकारितेचा मूलभूत भाग आहे. पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी भूमिका यावेळी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आला असून तो तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *