आर्यन्स सन्मान २०२४’ पुरस्कार सोहळा २५ जानेवारीला, विशेष पुरस्कार जाहीर
हिजन २४ तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
गणेश तळेकर (मुंबई)
पुणे
‘आर्यन्स सन्मान २०२४’ चा अंतिम पुरस्कार सोहळा २५ जानेवारी रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंचवर सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्यात नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील कर्तृत्ववान कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावर्षीच्या सोहळ्यात ‘आर्यन्स सन्मान’ पुरस्कारांबरोबरच दोन विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट समीक्षक आणि लेखक-दिग्दर्शक श्री. अशोक राणे यांना ‘आर्यन्स सन्मान’ विशेष पुरस्काराने गौरवण्यात येईल. याशिवाय, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांना प्रायोगिक नाट्य चळवळीच्या योगदानासाठी विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.
सोहळ्यात मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख कलाकारांचा नृत्याविष्कार सादर केला जाईल. कलाकारांमध्ये वैदेही परशूरामी, मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, पुष्कर जोग, अंकित मोहन, प्रथमेश परब, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, श्वेता खरात, जुई बेंडखळे, आणि अस्मिता चिंचाळकर यांचा समावेश आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि डॅा. श्वेता पेंडसे सांभाळणार आहेत.
या सोहळ्यात ‘आर्यन्स सन्मान २०२४’ च्या ट्रॅाफीवर कोणता कलाकार आणि चित्रपट आपले नाव कोरणार, हे पाहण्यासाठी रसिक आणि सेलिब्रिटी दोघेही उत्सुक आहेत.