पाटण तालुक्यातील नाणेगाव केंद्राने सुरू केलेला स्पर्धा परीक्षा नवोपक्रम आणि टॅलेंट बॅच उपक्रम हा डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमामुळे हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळून त्यांच्या उज्ज्वल यशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
चाफळ बीटचे विस्तार अधिकारी संजय यादव यांनी नाणेगाव पॅटर्नची प्रशंसा करत, “हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श ठरेल,” असे मत व्यक्त केले. नाणेगाव केंद्रातील टॅलेंट बॅच वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी, “केंद्र संचालक दादासाहेब गायकवाड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तज्ञ शिक्षकांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे. नियोजनबद्ध अध्यापन व सरावामुळे येथील मुले नक्कीच यशस्वी होतील,” असे सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार, सुरेश साळवे, मुख्याध्यापक पूनम माने यांचा समावेश होता. पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उमेश सुतार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब गायकवाड यांनी केले, तर सूत्रसंचालन रोहिणी शिंदे यांनी केले. रुपेश वळसे यांनी आभार मानले.
नाणेगाव पॅटर्न पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा बनत असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची आशा आहे.