श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी विवाह सोहळा थाटात संपन्न

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)

म्हसवड: (दिलीपराज कीर्तने )

येथील ग्रामदैवत व लाखो भक्तांचे कुलदैवत श्री सिध्दनाथ आणि माता जोगेश्वरी देवीचा भव्य विवाह सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चार, मंगलाष्टक आणि शाही वाद्यांच्या गजरात पार पडला. या उत्सवी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 

दीपावली पाडव्याच्या दिवशी घटस्थापना:
कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर श्री म्हातारदेवाच्या मूर्तीसमोर सालकरी यांच्या हस्ते घटस्थापनेने विवाह सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुख्य मंदिरासमोरील हत्ती मंडपात देवी जोगेश्वरी व श्री सिध्दनाथाच्या उत्सव मूर्तींना हळदी लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात भाऊबीज, दिवाळी मैदान यांसारखे धार्मिक कार्यक्रमही पार पडले.

सजवलेल्या अंबारीत उत्सव मूर्तींचे आगमन:
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरासमोरील मंडपातील अखंड पाषाणातील हत्तीच्या मूर्तीवर सजविलेल्या अंबारीत श्री सिध्दनाथाची उत्सव मूर्ती सायंकाळी स्थानापन्न करण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. परिसरातील शेतकऱ्यांनी या सोहळ्यासाठी उसाच्या मोळ्या अर्पण केल्या होत्या.

मंदिर परिसरात दीपमाळ आणि विद्युत रोषणाई:
मंदिर आवारातील दीपमाळ सायंकाळी उजळवण्यात आली. मंदिराच्या शिखरावर फुलांच्या आणि विद्युत दिव्यांच्या माळांनी सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिर परिसर अत्यंत भव्य दिसत होता. गावोगावच्या गजी मंडळांनी गजीनृत्य सादर केले, आणि दिवटी धारकांनी हत्तीसमोर रांग धरली होती.

धार्मिक विधींनी सोहळ्याची सांगता:
रात्री साडे अकरा वाजता सालकऱ्यांनी अंबारीतील मूर्ती मुख्य गाभार्यात आणली आणि मध्यरात्री बारा वाजता पुरोहितांनी मंगलाष्टकांच्या मधुर सुरात विवाह विधी पार पाडला. या विवाह सोहोळ्यास मानाचा पोशाख घेऊन आलेले मानकरी ओंकार राजेंद्र माने , गणेश माने , सालकरी महेश गुरव , व त्यांच्या पत्नी , कुरवली शालन सांगावे येथील रथाचे मानकरी तेजसिंह राजेमाने , दिपसिंह राजेमाने , पृथ्वीराज राजेमाने , सयाजीराजे राजेमाने , विश्वजीत राजेमाने ,गणपतराव राजेमाने मंदीराचे विश्वस्त , मानकरी गुरव मंडळी , श्री सिद्धनाथ मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी  व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.  मानकरी आणि सेवेकरी तसेच अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. सोहळ्यादरम्यान पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

रथोत्सवाने सोहळ्याची सांगता:
विवाह सोहळ्याची सांगता मार्गशीर्ष प्रतिपदेला वधू-वरांच्या वरात अर्थात रथोत्सवाने होणार आहे. सोमवार २ डिसेंबर रोजी म्हसवड येथील रिंगावण पेठ मैदानावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथयात्रा पार पडेल, असे मंदिर ट्रस्टने सांगितले.

भाविकांचा सहभाग आणि भक्तीचा उत्साह:
या संपूर्ण सोहळ्यात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. नगरप्रदक्षिणा आणि उपवासाचे विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *