कराडमध्ये सैनिक सन्मान रॅली आणि सैनिक मेळावा संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड, १० ऑक्टोबर २०२४:
भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कराडमध्ये भव्य सैनिक सन्मान रॅली व सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात प्रीती संगम येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यानंतर विजय दिवस चौक येथे विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान परिसरात भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी कराड शहर दणाणून गेले.

तहसीलदार कार्यालयात स्वतंत्र सैनिक दादासाहेब उंडाळकर यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून सैनिक सन्मान रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर आयोजित सैनिक मेळाव्यात लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा, यांच्या प्रमुख उपस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींवर चर्चा झाली.


