राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (दादा गटाच्या) सातारा-जावळी विधानसभा अध्यक्षपदी रविंद्र शेलार यांची निवड आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
अक्षय गोरे
बामणोली:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पदाधिकारी निवडी जाहीर झाल्या असून जिल्हा कार्याध्यक्ष अमित दादा कदम आणि सरचिटणीस निवास शिंदे यांच्या हस्ते सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी अमितदादांचे कट्टर समर्थक व दोन्ही तालुक्यामध्ये तळागाळात दांडगा जनसंपर्क असणारे सामाजिक कार्यकर्ते, अंधारीचे सुपुत्र, ग्रुप ग्रामपंचायत अंधारी-कास चे उपसरपंच रवींद्र पांडुरंग शेलार यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडी जाहीर करून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न झाला आहे.
रविंद्र शेलार हे गेल्या ३० वर्षापासून राजकीय तसेच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शेलार हे गेल्या २५ ते ३० वर्षापासून मा. आ. कै. जी जी कदम यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असल्याचे जगजाहीर आहे. त्यांची यापूर्वी सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.


