म्हसवडच्या रिंगावण यात्रेसाठी नगरपालिकेचे यंदा हटके नियोजन!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या प्रसिद्ध रिंगावण यात्रेची तयारी यंदा म्हसवड नगरपालिकेने आतापासूनच सुरू केली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या रिंगावण यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेचे नियोजन, भाविकांना सुविधा, व्यापाऱ्यांना जागा वाटप, मनोरंजनाची साधने, महिला सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध महत्त्वाच्या विषयांवर माहिती देण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यंदाची यात्रा अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्याचा नगरपालिकेचा मानस असून, यात्रेकरू व भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षा पूजा विरकर यांनी दिली.
नगराध्यक्षा पूजा विरकर म्हणाल्या की, यंदा रिंगावण यात्रा वेगळ्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांना यात्रेच्या पंधरा दिवस अगोदरच जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, शनिवारपासून जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना वेळेत दुकाने उभारून व्यवसाय सुरू करता येणार आहे. यात्रा जास्तीत जास्त दिवस चालावी आणि भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी नगरपालिका प्रयत्नशील राहणार आहे.
नगरसेवक विजय धट यांनी यंदाच्या यात्रेच्या विशेष नियोजनाची माहिती देताना सांगितले की, यात्रेत येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी वॉच टॉवर उभारण्यात येणार असून, यंदा रथाची प्रदक्षिणा नदीपात्रातून काढण्यात येणार आहे. माण नदीच्या पात्रात सध्या पाणी नसल्याने यात्रेकरू आणि व्यावसायिकांसाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे.
यात्रेत करमणुकीची साधने म्हणून पाळणे, सिनेमा तंबू आणि तमाशाचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सिनेमा तंबू आणि तमाशा व्यावसायिकांना जागा भाडेमुक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाळण्यांचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे असावेत, यासाठी पाळण्याचे तिकीट केवळ ५० रुपये निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित पाळणे चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जागा वाटपाबाबत स्पष्ट भूमिका मांडताना विजय धट म्हणाले की, यात्रेतील जागा केवळ प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनाच दिली जाणार आहे. कमी दराने जागा घेऊन ती दुसऱ्यांना जादा दराने विकणाऱ्या दलालांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. पौर्णिमेपर्यंत जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असून, पाळणे चालकांसाठी दर निश्चित करून जागा वाटपाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात्रेत दादागिरी आणि मनमानीला चाप बसविण्यासाठी नगरपालिका कठोर भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी यात्रेच्या काळात भाविकांसाठी पिण्याच्या मुबलक व शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच यात्रेकरूंना ठिकठिकाणी अंघोळीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रा अधिकाधिक दिवस सुरू राहावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असून, यात्रा कालावधीत सर्व नगरसेवक भाविकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत तत्पर राहतील. जागा भाडेही कमीत कमी आकारण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक अकिल काझी यांनी रथमार्गावरील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला. रथाच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे संबंधितांनी स्वतःहून काढून नगरपालिकेला सहकार्य करावे. अन्यथा अतिक्रमणे न काढणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच नदीपात्रातील खड्डे बुजवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात येणार असून, सर्वांच्या सहकार्याने यंदाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि नियोजनबद्ध पद्धतीने भरविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय तयारीची माहिती देताना सांगितले की, यात्रेला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यासाठी नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली असून, शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांना जागा वाटप करताना जागेचे योग्य नियोजन व आखणी केली जाणार असून, शनिवारपासून जागा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांशीही फोनद्वारे संपर्क साधून त्यांना यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता नगरपालिका प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या यात्रेचे ठळक वैशिष्ट्य
– ९ डिसेंबर रोजी रिंगावण यात्रेचा मुख्य सोहळा.
– शनिवारपासून व्यापाऱ्यांना जागा वाटप.
– नदीपात्रातून श्रींच्या रथाची प्रदक्षिणा.
– पाळण्याचे तिकीट ५० रुपये निश्चित करण्याचे नियोजन.
– तमाशा व सिनेमा तंबूंना मोफत जागा.
– महिलांच्या सुरक्षिततेसाठी गर्दीच्या ठिकाणी वॉच टॉवर.
– भाविकांसाठी शुद्ध पाणी व अंघोळीच्या सुविधा.
– नदीपात्रातील खड्डे बुजवून स्वच्छता.
– दलालांना आळा घालून प्रत्यक्ष व्यावसायिकांनाच जागा.
– अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई.
या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला नगरसेवक धनाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा पूजा विरकर यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
एकूणच, म्हसवडच्या रिंगावण यात्रेला यंदा अधिक शिस्त, सुरक्षितता, स्वच्छता आणि सर्वसामान्य भाविकांना परवडणाऱ्या सुविधांची जोड देण्याचा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. आता या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते आणि भाविकांना त्याचा किती लाभ मिळतो, याकडे म्हसवडकरांसह यात्रेकरूंचे लक्ष लागले आहे.

