तारळे पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाला वन विभागाची नोटीस; काम तात्काळ थांबविण्याचे आदेश!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड (उंब्रज ):

तारळे पम्प्ड स्टोरेज प्रकल्पाच्या (Tarali PSP) कामावरून आता वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी प्राप्त नसतानाही प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाटण वनपरिक्षेत्र कार्यालयाने संबंधित अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्याला दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच आवश्यक परवानग्या मिळेपर्यंत प्रकल्पाचे सर्व काम तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पाटण यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (National Board for Wildlife – NBWL) वैध पूर्वपरवानगी नसताना प्रकल्पाचे काम कोणत्या अधिकारात सुरू करण्यात आले, याबाबत तीन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय प्रकल्पाच्या परिसरात वृक्षतोड करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची माहिती मागविण्यात आली आहे. वृक्षतोडीची परवानगी घेतली असल्यास किती झाडे तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे, यासह परवानगीची मूळ अथवा साक्षांकित कागदपत्रे, प्रकल्पाशी संबंधित इतर सर्व वैधानिक मंजुरी आणि नकाशे वन विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी यापूर्वीच पाठपुरावा केला होता. दि. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल करून प्रकल्पाच्या कामाबाबत लक्ष वेधले होते. त्यानंतर दि. १३ नोव्हेंबर रोजी वन विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याने या प्रकरणाला आता प्रशासकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

नोटीसमध्ये पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, विहित तीन दिवसांच्या मुदतीत समाधानकारक खुलासा आणि आवश्यक परवानगीची कागदपत्रे सादर न केल्यास किंवा प्रकल्पाचे काम सुरू ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध वन कायद्यांनुसार कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

आता अदानी प्रकल्प व्यवस्थापनाकडून वन विभागाला काय खुलासा दिला जातो, आवश्यक परवानग्या सादर होतात का आणि प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात थांबविले जाते का, याकडे तारळे परिसरातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *