म्हसवड पोलिसांचा मोठा उपक्रम! ४० गावांत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना होणार
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड:प्रतिनिधी
म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढत्या चोऱ्या व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हद्दीतील ४० गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे.तसेच गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सन २०२६ चे ‘गणराया अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिली.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता म्हसवड पोलीस स्टेशन येथे हा कार्यक्रम होणार आहे.
म्हसवड पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असून पोलीस मनुष्यबळ मर्यादित आहे. त्यामुळे गावोगावी घडणाऱ्या चोरी, घरफोडी व अन्य गुन्हेगारी घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येत आहे. ग्रामरक्षकांना टी-शर्ट, लाठी, शिट्टी व बॅटरीचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील पोलीस पाटील व ग्रामरक्षक यांच्या माध्यमातून गावाच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जाणार आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याची जबाबदारी ग्रामरक्षक पार पाडणार आहेत. या उपक्रमामुळे पोलीस आणि ग्रामस्थांमधील समन्वय वाढून ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना सन २०२६ चे ‘गणराया अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले आहे.

