पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक; १५० कोटींच्या विकास आराखड्याला गती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

संत नामदेव महाराजांच्या भक्ती, समता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंढरपुरात भव्य संत नामदेव महाराज स्मारक उभारण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. सुमारे १५० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित स्मारकात आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारशाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १०० कोटी, तर दुसऱ्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची कामे हाती घेण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले.

संत नामदेव महाराज स्मारक जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रस्तावित स्मारकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उच्च अधिकार समितीने यापूर्वी स्मारकासाठी ९३.५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. मात्र प्रस्तावित सुविधांचा विस्तार आणि स्मारकाचे व्यापक स्वरूप लक्षात घेता सुमारे १५० कोटी रुपयांची कामे अपेक्षित असल्याने वाढीव आराखडा शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पंढरपूरच्या धार्मिक वैभवाला संत नामदेव महाराजांच्या स्मारकाची नवी ओळख मिळणार असून, हे स्मारक केवळ एक वास्तू न राहता आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. संत नामदेव महाराजांचा भव्य पुतळा, स्वागत कमान, माहिती केंद्र, संग्रहालय, वाचनालय, ध्यान केंद्र, वसतिगृह, भजन-कीर्तनासाठी खुली जागा, स्मरणिका केंद्र, उपहारगृह तसेच बहुउद्देशीय रंगमंच आणि ऑडिटोरियम अशा विविध सुविधा येथे प्रस्तावित आहेत.

विशेष म्हणजे संत नामदेव महाराजांचा जीवनप्रवास आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यागतांसमोर उलगडण्याची संकल्पना आहे. त्यांचा जन्म, विठ्ठलभक्ती, संत ज्ञानेश्वर महाराजांशी झालेली भेट, संत गोरा कुंभार व विसोबा खेचर यांच्याशी संबंधित प्रसंग, उत्तर भारत व पंजाबमधील प्रवास, अभंगपरंपरा आणि ‘नामदेव पायरी’ यांसह त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे दृक्-श्राव्य आणि अनुभवात्मक माध्यमातून सादर करण्यात येणार आहेत.

स्मारकातील ‘संतग्राम’ ही संकल्पनाही विशेष आकर्षण ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत दामाजीपंत आणि संत सावता माळी यांच्यासह विविध संतांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक संदेशाचा परिचय येथे अनुभवात्मक पद्धतीने करून देण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा समृद्ध वारसा एका ठिकाणी अनुभवण्याची संधी भाविक आणि पर्यटकांना मिळणार आहे.

प्रस्तावित स्मारकासाठी मौजे शेगाव-दुमाला येथील गट क्रमांक १५७ मधील रेल्वेची सुमारे ६.१० हेक्टर जागा प्रस्तावित असून, त्यापैकी सुमारे ४.१० हेक्टर क्षेत्रात स्मारक विकसित करण्याची संकल्पना आहे. हे ठिकाण श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून अंदाजे अडीच किलोमीटर अंतरावर आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

संत नामदेव महाराजांच्या स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगत सातारा जिल्हा नासपचे अध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित आता प्रत्यक्षात दिसू लागले असून, संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक साकारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे पोरे यांनी सांगितले.

स्मारकाच्या माध्यमातून संत नामदेव महाराजांच्या विचारांचा, भक्तीपरंपरेचा आणि समतेच्या संदेशाचा प्रसार होण्यासोबतच पंढरपूरच्या धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील कामांना गती देऊन निर्धारित कालावधीत ती पूर्ण करावीत आणि दुसऱ्या टप्प्यातील वाढीव कामांसाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *