संघर्षाच्या तालावर उमलतोय ‘जेन-झी’चा नवा कलाकार! नांदेडच्या आंबेडकरनगरातील प्रज्योत कांबळेचा स्वप्नांसाठी संघर्ष
व्हिजन २४ तास न्यूज
नांदेड : उद्धव सरोदे
प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि कलेच्या जोरावर नांदेडचा प्रज्योत अनिल कांबळे स्वतःची ओळख निर्माण करत आहे. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी काम करतानाच तो गाणी लिहितो, गातो, संगीतबद्ध करतो आणि व्हिडिओ तयार करतो.
महाविद्यालयीन सांस्कृतिक कार्यक्रम आणि पीपल्स महाविद्यालयातील ‘कवी कट्टा’मुळे त्याच्या कलेला व्यासपीठ मिळाले. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए. डॉ. प्रवीण पाटील यांनी त्याला आर्थिक मदत व प्रोत्साहन दिले.
दिवसभर काम, रात्री स्वप्नांसाठी धडपड
शिक्षण आणि स्टुडिओचा खर्च भागवण्यासाठी प्रज्योत बलून डेकोरेशन, गिटार शिकवणे आणि डान्स क्लास घेण्याचे काम करतो. मात्र कलाकार होण्याचे स्वप्न त्याने सोडलेले नाही.
मोनू कदम व्हिडिओग्राफी, चैतन्य खिल्लारे एडिटिंग, रितेश गजभारे सिनेमॅटिक काम, तर योगिता जाधव अभिनयात मदत करते. या टीमच्या सहकार्याने त्याच्या कलाकृती आकार घेत आहेत.
प्रज्योत पीपल्स महाविद्यालयात एम.ए. मराठीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील प्लंबर असून आई घरकाम करते. प्रतिकूल परिस्थितीतही कलेच्या माध्यमातून ओळख निर्माण करण्याची त्याची धडपड तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
— भारत दाढेल, नांदेड

