म्हसवड-मायणी मार्गावर इनोव्हा-मोटारसायकलची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :प्रतिनिधी

म्हसवड-मायणी मार्गावर दिडवाघवाडी हद्दीतील ढेंबरे वस्ती स्टॉपजवळ इनोव्हा कारने मोटारसायकलला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात भिमराव चांगदेव शिंदे (वय ६५, रा. ढाकणी, ता. माण) यांचा मृत्यू झाला, तर रघुनाथ नामदेव शिंदे (वय ५६) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर इनोव्हा चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला.

हा अपघात बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दिडवाघवाडी गावच्या हद्दीत घडला. भिमराव शिंदे व रघुनाथ शिंदे हे होंडा शाईन मोटारसायकलवरून म्हसवडहून ढाकणीकडे जात होते. त्यावेळी मायणीकडून म्हसवडकडे येणाऱ्या इनोव्हा कार क्रमांक MH 04 GG 9292 वरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत रॉंग साईडला जाऊन समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या धडकेत दोन्ही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व दौलताडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भिमराव शिंदे यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.

अपघातानंतर इनोव्हा चालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता तसेच अपघाताची माहिती न देता वाहन घटनास्थळीच सोडून पलायन केले. याप्रकरणी भिमराव शिंदे यांचा मुलगा आण्णा भिमराव शिंदे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २२२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४(अ)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार डी.पी. खाडे पुढील तपास करीत आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात इनोव्हा चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *