म्हसवडमध्ये ६७६ वा संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा होणार उत्साहात साजरा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

शिंपी समाजाचे आराध्यदैवत व संत परंपरेतील थोर संत, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त म्हसवड येथे मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नामदेव शिंपी समाज, म्हसवड येथील विश्वस्त मंडळाच्या वतीने हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून समाजातील सर्व बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोहळ्याची सुरुवात सकाळी ६ वाजता अभिषेक व काकड आरतीने होणार आहे. त्यानंतर धार्मिक विधी व पूजाअर्चा करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता श्री संत नामदेव महाराज मंदिर, म्हसवड येथून पालखी सोहळ्याला प्रस्थान होणार आहे. पालखी मिरवणुकीदरम्यान म्हसवड शहरातील ठराविक चौकांमध्ये महिला भगिनींच्या वतीने विविध कला-अविष्कारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याला धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक रंगतही प्राप्त होणार आहे.

पालखी मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर पालखीचे मंदिरात आगमन होईल. त्यानंतर ह.भ.प. कीर्तनकार श्री. जगदीश महाराज पोरे यांचे सुश्राव्य फुलांचे कीर्तन होणार आहे. कीर्तनातून संत नामदेव महाराजांचे जीवनकार्य, भक्तीपरंपरा, सामाजिक समतेचा संदेश आणि अध्यात्मिक विचार यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने भाविक व समाजबांधवांसाठी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचे सौजन्य श्री. नामदेव मधुकर चांडवले व कुटुंबीय यांनी स्वीकारले आहे.

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संतांपैकी एक असून त्यांच्या अभंगवाणी आणि भक्तीपर विचारांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक व सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. त्यांच्या भक्ती, समता, बंधुभाव आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच बालकांनीही सहभागी होऊन संत नामदेव महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष इंजि. श्री. सुनील श्रीधर पोरे, सचिव श्री. भिकू जगन्नाथ पोरे, खजिनदार श्री. महेश उद्धव पतंगे तसेच विश्वस्त श्री. चंद्रकांत किसन पोरे, श्री. विजय भिकू चांडवले, श्री. नामदेव मधुकर चांडवले, श्री. प्रकाश सदाशिव डोंगरे, श्री. संदीप विष्णुदास नामदास, सौ. अश्विनी अतुल फुटाणे, सौ. सुनीता वसंत नामदास व सौ. चंदाराणी दीपक फुटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

संत नामदेव महाराजांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यास म्हसवड व परिसरातील सर्व शिंपी समाज बांधवांनी आणि भगिनींनी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनम्र विनंती अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त मंडळ, शिंपी समाज म्हसवड यांच्या वतीने करण्यात आली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *