मुक्काम पोस्ट जांभुळणी’ची ऐतिहासिक नोंद!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
जांभुळणी (ता. माण) गावाच्या विकास प्रवासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा ऐतिहासिक क्षण शनिवारी अनुभवायला मिळाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावाला स्वतंत्र पोस्ट ऑफिसची भेट मिळाली असून, ‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ अशी अधिकृत ओळख प्राप्त झाली. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांच्या हस्ते नवीन पोस्ट ऑफिसचे लोकार्पण उत्साहात पार पडले. यावेळी कराड डाक विभागाच्या अधीक्षक स्वाती दळवी प्रमुख उपस्थित होत्या.
लोकार्पण सोहळ्यानिमित्त संपूर्ण गावात उत्सवी वातावरण होते. ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. गजी मंडळाने पारंपरिक गजी नृत्य सादर करून जल्लोष साजरा केला, तर खासदार मोहिते-पाटील यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी ‘मुक्काम पोस्ट जांभुळणी’ ही केवळ नवी ओळख नसून गावाच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगितले. त्यांनी जांभुळणी येथे अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्याची मागणी केली. या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत खासदार मोहिते-पाटील यांनी जांभुळणीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा आणि सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
महेश करचे यांनी सांगितले की, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात तब्बल ९१ नवीन पोस्ट ऑफिस मंजूर झाली असून, ग्रामीण भागाच्या विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, “पोस्ट ऑफिस म्हणजे आता केवळ टपाल सेवा नाही, तर सर्वसामान्यांची विश्वासार्ह बँक आहे. बचत, विमा, पेन्शन आणि विविध आर्थिक योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करावे.” त्यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांमधून मिळणाऱ्या रकमेची पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहनही केले.
जांभुळणीशी आपल्या कुटुंबाचे तीन पिढ्यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगत त्यांनी सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या गावाशी असलेल्या संबंधांचा उल्लेख केला. श्री भोजलिंग देवस्थानावरील आपल्या कुटुंबाची श्रद्धाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ तोरणे यांनी केले, तर दयाराम गोरवे यांनी आभार मानले. यावेळी तेजसिंह राजेमाने, किशोर सोनावणे, सुरेंद्र मोरे, अण्णासाहेब मगर, प्रमोद खाडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

