शैक्षणिक साहित्याचे वाटप; कराड नगरपरिषद शाळा क्र. ९ मध्ये विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या जनहिताय फाउंडेशनच्या वतीने कराड नगरपरिषद शाळा क्रमांक ९ येथे वही व पेन वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर संपूर्ण शाळा उत्साहाने भारावून गेली.
शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जयसिंग पाटील व उपमुख्याध्यापिका अंजली अजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षण प्रवासाला बळ देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शांताराम थोरवडे, राजेंद्र ताटे, अशोक पवार, विद्या मोरे, रेश्मा मिस्त्री, विजया माने, राधिका जाधव तसेच ‘सिटी न्यूज’चे संपादक सागर गिरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. “आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या भारताचे सक्षम नागरिक आहेत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक-शिक्षिकांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी शाळेच्या वतीने जनहिताय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या जनहिताय फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कराड परिसरातून आणि पालकांकडूनही मनापासून स्वागत व कौतुक होत आहे.

