माजी सैनिकांना उद्योजकतेची नवी दिशा; इलेक्ट्रिक चार्जिंग सायकल व्यवसायासाठी संयुक्त पुढाकार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

कुलदीप मोहिते | कराड

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर माजी सैनिकांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने उपसंचालक सैनिक कल्याण विभाग, पुणे आणि सैनिक फेडरेशन (माजी सैनिक) संघटनेच्या वतीने महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीस उपसंचालक सैनिक कल्याण विभाग पुणे लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, सैनिक फेडरेशन (माजी सैनिक) संघटनेचे प्रशांत कदम तसेच राज्य सेल्स एक्झिक्युटिव्ह विक्रम ननावरे उपस्थित होते. बैठकीत माजी सैनिकांना उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्याच्या घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच भविष्यातील इंधन तुटवड्याचा विचार करता, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक चार्जिंग सायकल या संकल्पनेवर विशेष भर देण्यात आला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात इलेक्ट्रिक चार्जिंग सायकल व्यवसायाचा विस्तार करून माजी सैनिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना ले. कर्नल सतेश हंगे यांनी सांगितले की, “सैनिक कल्याण विभाग माजी सैनिकांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी विविध योजनांद्वारे आर्थिक मदत आणि मार्गदर्शन देत आहे. माजी सैनिकांनी उद्योग क्षेत्रात पुढाकार घेऊन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी.”

राज्य सेल्स एक्झिक्युटिव्ह विक्रम ननावरे यांनी इलेक्ट्रिक चार्जिंग सायकल शोरूमची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय कसा उभारता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागांत फ्रँचायझी उपलब्ध करून देत सेवानिवृत्त सैनिकांना उद्योजक बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांनी माजी सैनिकांना आवाहन करताना सांगितले की, “आज प्रत्येक क्षेत्रात माजी सैनिकांनी नेतृत्वाची भूमिका घ्यावी. देशासाठी सेवा बजावलेल्या सैनिकांनी आता समाज आणि पर्यावरणाच्या हितासाठी पुढे येऊन इलेक्ट्रिक चार्जिंग सायकलसारख्या आधुनिक व शाश्वत पर्यायाचा प्रसार करणे काळाची गरज आहे.”

माजी सैनिकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत उद्योजकता विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे राज्यातील माजी सैनिकांसाठी ही बैठक नवी संधी आणि नव्या दिशेचा मार्गदर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *