सैनिकांच्या प्रश्नांवर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची तत्पर भूमिका; माजी सैनिक संरक्षण समिती बैठकीत विविध प्रकरणांचा आढावा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
कुलदीप मोहिते
सातारा /उंब्रज प्रतिनिधी :
जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या समस्या व सुरक्षेच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देत निखिल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक जिल्हा संरक्षण समितीची आढावा बैठक उत्साहात पार पडली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे बुधवारी (दि. २० मे) झालेल्या या बैठकीत अनेक गंभीर तक्रारींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बर्गे, सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम, विविध तालुक्यांतील सैनिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत कोर्टी (ता. कराड) येथील ८४ वर्षीय माजी सैनिक मोहन थोरात यांची ५५ लाख रुपयांची घर खरेदी व्यवहारातून झालेली आर्थिक फसवणूक, मलकापूर येथे सेवारत सैनिक अशोक रवदळे यांच्या आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील तपासातील त्रुटी, टकले बोरगाव येथील विधवा माजी सैनिक पत्नी अरुणा भिसे यांची फसवणूक, तसेच सातारा व कोरेगाव तालुक्यातील जमीन अतिक्रमण आणि मानसिक त्रासाच्या तक्रारींवर चर्चा झाली.

यावेळी संबंधित प्रकरणांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन देत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले जाईल, असे स्पष्ट केले.

बैठकीदरम्यान संरक्षण समिती सदस्य प्रशांत कदम यांनी शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील सर्व डीवायएसपी कार्यालये व पोलीस ठाण्यांना संरक्षण समितीविषयी सूचना देण्याची मागणी केली. तसेच सैनिक व माजी सैनिकांवर पूर्व चौकशी न करता गुन्हे दाखल होण्याचे प्रकार वाढत असल्याने याबाबत विशेष काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, कोरेगाव तालुक्यातील माजी सैनिकाच्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणाचा तीन दिवसांत उलगडा करणे, तसेच रणजीत निकम खून प्रकरण आणि अशोक रवदळे यांच्या आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणातील प्रलंबित चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल माजी सैनिक संघटनांच्या वतीने निखिल पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला.

या बैठकीस माजी सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पवार, सैनिक संघटनांचे विविध तालुकाध्यक्ष, माजी सैनिक उद्योजक तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *