दृष्टिहीनांच्या बुद्धीला मिळाले व्यासपीठ; मुंबईत ‘माइंड ओव्हरसाइट’ बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्हिजन २४ तास न्यूज
मुंबई, : प्रतिनिधी
दृष्टिहीन व्यक्तींमधील बुद्धिमत्ता, आत्मविश्वास आणि कौशल्यांना नवे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया (VFI) आणि आधारिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “माइंड ओव्हरसाइट” या विशेष बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आयएमसी, चर्चगेट, मुंबई येथे उत्साहात पार पडले. दृष्टिहीनांसाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला सहभागी खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समावेशकता आणि सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. बुद्धिबळाच्या पटावर आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवत दृष्टिहीन खेळाडूंनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या डॉ. कुलीन कोठारी फाउंडेशन, व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नयन चक्रवर्ती व त्यांची टीम, तसेच आधारिका फाउंडेशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्थेतर्फे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवर, स्वयंसेवक, माध्यम प्रतिनिधी, समर्थक आणि संपूर्ण VFI टीमच्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक संस्मरणीय ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. दृष्टिहीन व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

