कोयना जंगलात ‘हिरकणी’ वाघीण पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील GPS कॉलर गायब

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
कुलदीप मोहिते
कराड :- प्रतिनिधी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील STR T6 ‘हिरकणी’ वाघीण नुकतीच वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली असून तिच्या गळ्यातील GPS कॉलर मात्र दिसून आलेले नाही. त्यामुळे वनविभागात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या दहा दिवसांपासून हिरकणी वाघिणीच्या सॅटेलाईट GPS कॉलरमधून एकाच ठिकाणाहून सिग्नल मिळत होते. सिग्नलमध्ये कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याने वनविभागाने गस्ती पथकांची संख्या वाढवत मोठ्या परिसरात शोधमोहीम राबवली. मात्र कॉलर असूनही वाघिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे कॉलरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा ती गळून पडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

यानंतर वनविभागाने कोयना परिसरात अतिरिक्त ट्रॅप कॅमेरे बसवून त्यांचे विश्लेषण सुरू केले. दरम्यान, कोयना जंगलातील कोअर भागात फिरताना एक वाघीण कॅमेऱ्यात दिसून आली. तिच्या अंगावरील पट्ट्यांचे विश्लेषण केल्यानंतर तीच STR T6 ‘हिरकणी’ असल्याचे स्पष्ट झाले. मात्र तिच्या गळ्यात GPS कॉलर दिसत नव्हते.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघिणीने स्वतःच्या पंज्याने कॉलर काढून टाकले असावे किंवा काही तांत्रिक कारणामुळे ते गळून पडले असावे. विशेष म्हणजे कॉलर अद्याप कार्यरत असून अधूनमधून त्याचे सिग्नल मिळत असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.

सध्या उपलब्ध फोटो व व्हिडिओंमध्ये हिरकणी वाघीण पूर्णपणे सुदृढ दिसत असून तिचे वजन वाढल्याचेही प्रथमदर्शनी जाणवत आहे. तसेच ती झाडांच्या खोडांवर मूत्र फवारून आपली हद्द निश्चित करत असल्याच्या खुणाही वनविभागाला आढळल्या आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना कोअर भागात STR T6 ‘हिरकणी’ वाघिणीस निसर्गमुक्त करण्यात आले होते.

याबाबत क्षेत्र संचालक तुषार चव्हाण तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी माहिती दिली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *