बौद्ध पौर्णिमेनिमित्त पानस्थळावरील प्राणी पाहणी; सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात १५५६ वन्यजीवांची नोंद

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रांतर्गत आयोजित करण्यात आलेला “पानस्थळावरील प्राणी पाहणी निसर्गानुभव कार्यक्रम २०२६” हा उपक्रम दि. १ मे २०२६ रोजी सह्याद्री व्याघ्र राखीव, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात उत्साहात पार पडला. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश अधिक असल्याने वन्यजीव निरीक्षणासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो.

माननीय क्षेत्र संचालक श्री. तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात सह्याद्री व्याघ्र राखीव, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील एकूण १३४ मचानांवर १७५ वनकर्मचारी तसेच २२८ निसर्गप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला. या पाहणीदरम्यान एकूण १५५६ वन्यप्राणी, पक्षी व सरीसृपांची नोंद करण्यात आली.

कार्यक्रमात मांसभक्षी वर्गातील ५ बिबट्यांच्या अप्रत्यक्ष खुणा आढळून आल्या. याशिवाय २४० सांबर, १६५ चितळ, ३२ अस्वल, २३ भेकर, १८ मुंगूस, २९ रानकुत्रे, ७ उदमांजर, २३ शेकरू, १ कोल्हा, ३ रानमांजर, ९८ रानडुक्कर, २७ ससे, ३४७ रानगवे, ७१ रानम्हैस, ६१ माकडे, १८ साळिंदर, १ तरस, ४ पिसोरी आदी वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली.

पक्षी निरीक्षणात १०८ रानकोंबडे, ६८ मोर, १४ होला, १२ रेड व्हेटेड बुलबुल, ७ धनेश, ६ घुबड, ४ हरियाल पक्षी, ४ पोपट, ३ नाईट जार, २ खंड्या, २ घार, २ कोकीळा, १ ब्राम्हणी घार, १ पांढऱ्या गालाचा बारबेट, १ मलबार शिटेबाज थ्रश, १ मोठा बुलबुल, १ आशियाई परिनिळा पक्षी, १ सातभाई, १ पांढरे राखाडी घुबड, १ पारवा आदी विविध पक्ष्यांची नोंद झाली.

तसेच सरीसृप वर्गात २ धामण, २ नाग, २ घोणस, १ अजगर, १ सारडा व १० घोरपडी आढळून आल्या. याशिवाय निसर्गप्रेमींनी सुमारे १०० प्रकारच्या फुलपाखरांचीही नोंद केली.

वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *