अहिंसा पतसंस्थेकडून ऋतुजा म्हेत्रेचा गौरव; उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड (प्रतिनिधी) :

येथील अहिंसा पतसंस्थेच्या वतीने यशस्वी कामगिरीबद्दल ऋतुजा म्हेत्रे हिचा सन्मान करण्यात आला. हा सत्कार सोहळा म्हसवड नगरपरिषदेच्या कार्यकुशल उपनगराध्यक्षा सौ. श्रीदेवी निशांत पिसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीदेवी पिसे यांचा अहिंसा पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ऋतुजा म्हेत्रे तसेच उपस्थित मान्यवर व पालकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांनी मनोगतात सांगितले की, म्हसवडमध्ये कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा गौरव करण्याची परंपरा नितिन दोशी यांनी जपली आहे. ऋतुजाचे यश सर्वसामान्य कुटुंबातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असून तिने पुढील उंची गाठावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नितिनभाई दोशी यांनी आपल्या भाषणात ऋतुजाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, “तुझ्या यशाची गाडी अखेरच्या टप्प्यापर्यंत पोहोचावी,” अशी भावना व्यक्त केली. तसेच उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे यांच्या कामाचे कौतुक करत, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासकामे पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीदेवी पिसे यांनी म्हसवडच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देत युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना ऋतुजा म्हेत्रे हिने अहिंसा पतसंस्थेचे आभार मानत, “आपल्या मार्गदर्शनानुसार पुढील वाटचाल करत राहीन,” अशी भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, निशांत पिसे, शिवाजी म्हेत्रे, ऋतुजाचे पालक, बाळासाहेब म्हेत्रे, उपाध्यक्ष अभिराज गांधी, संचालक अनिल गाडे, बाळासाहेब सरतापे, धवल व्होरा यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व म्हसवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन हरिदास मासाळ यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *