सोशल मीडियावर मदतीचा महासागर… तरीही ‘सागर’ हरपला; माण तालुक्यात शोककळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी

माण तालुक्यातील धुळदेव येथील सागर प्रकाश रुपनवर (वय २४) या तरुणाचा भीषण अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर मदतीचा अक्षरशः महासागर उसळला होता, मात्र नियतीपुढे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि सागर अखेर काळाच्या पडद्याआड गेला.

अत्यंत कष्टकरी व गरीब कुटुंबातील सागर आणि त्याचा मोठा भाऊ पंकज रुपनवर हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. पंकज पोलीस दलात कार्यरत असून सागर खासगी कंपनीत काम करत होता. आई-वडिलांच्या कष्टातून उभं राहिलेलं कुटुंब हळूहळू स्थिरावत असतानाच या दुर्दैवी घटनेने मोठा आघात बसला.

दरवर्षीप्रमाणे धुळोबा देवाच्या यात्रेसाठी दोघे भाऊ पुण्यातून बुलेटवरून गावाकडे निघाले होते. मात्र पुणे–पंढरपूर महामार्गावरील बरड गावाजवळ अचानक समोर आलेल्या टेम्पोमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंकज यांची प्रकृती स्थिर होती, मात्र सागर गंभीर जखमी झाला होता. त्याचा एक पाय व एक हात मोडला होता, तसेच छातीवर झालेल्या जबर मारामुळे फुफ्फुस आणि हृदयाला गंभीर इजा झाली होती. डॉक्टरांनी तातडीने खर्चिक उपचारांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच गावकरी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले आणि काही तासांतच हजारो लोकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. सागरला वाचवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू होते.

तब्बल दहा दिवस सागर मृत्यूशी झुंज देत होता. अखेर १४ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. “सागर वाचावा” या आशेवर डोळे लावून बसलेल्या कुटुंबीयांसह संपूर्ण तालुक्याचा आशेचा किरण एका क्षणात हरपला.

सागरच्या पश्चात आई-वडील, भाऊ पंकज, आजी, चुलते व चुलत भाऊ असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावर श्रद्धांजलींचा अक्षरशः पूर आला आहे.

दरम्यान, “वेळेत अधिक सक्षम वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर सागरचा जीव वाचला असता,” अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून या घटनेने आरोग्य व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *