म्हसवडच्या झुंजार समाजसेवकाचा राज्यस्तरीय सन्मान राजकुमार डोंबे यांना ‘प्रशासनरत्न’ पुरस्कार प्रदान
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड (प्रतिनिधी) :
म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. राजकुमार डोंबे यांना प्रतिष्ठा फाउंडेशनच्या दशक महोत्सवानिमित्त ‘राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे रविवारी (दि. १२ एप्रिल २०२६) हजारोंच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेल्या तब्बल ४५ वर्षांपासून राजकुमार डोंबे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून, त्यांनी मागासवर्गीय, दलित, वंचित घटक, महिला, बेरोजगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात सातत्याने लढा दिला आहे. विविध प्रकरणांमध्ये कायदेशीर मार्गाने आवाज उठवत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. अनेक कंपन्यांमधील गैरव्यवहार उघडकीस आणून गुन्हे दाखल करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
डोंबे यांनी आतापर्यंत ७५ हून अधिक आंदोलनांद्वारे प्रशासन दरबारी विविध प्रश्न मांडून ते यशस्वीपणे सोडवले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी निर्भीड भूमिका घेत अनेक प्रकरणांतील पडदा फाश केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही त्यांनी भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना ‘समाजरत्न’, ‘समाज गौरव’, ‘कवीरत्न’ असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी सातारा, उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, आधार बहुउद्देशीय संस्था अहमदनगर, जिल्हा उद्योग केंद्र तसेच पोलीस प्रशासनाकडूनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
“जनसेवा हीच ईश्वर सेवा” या विचाराने प्रेरित होऊन डोंबे यांनी निस्वार्थीपणे कार्य सुरू ठेवले आहे. अध्यात्माची जोड आणि कायद्याचे सखोल ज्ञान यांच्या बळावर अनेक गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली. कोणतेही प्रकरण हातात घेतल्यावर त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, ही त्यांची खास ओळख आहे.
या सन्मानाबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये वर्षाताई देशपांडे (सातारा), सौ. शैला जाधव, युक्रांदचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, आप्पा अनारसे, सुदाम लगड, पंडित तुपे, युवराज मगदूम, सचिन पांडोले यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
म्हसवडवासीयांच्या वतीनेही राजकुमार डोंबे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्यांच्या कार्याला असेच यश लाभो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे.

