तासवडे एमआयडीसी स्फोट प्रकरणाला नवे वळण; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

कुलदीप मोहिते 

कराड | प्रतिनिधी

तासवडे (ता. कराड) येथील एमआयडीसी परिसरातील ‘मे. एस के एस फाईन केम’ कंपनीत झालेल्या भीषण स्फोट प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश एमआयडीसी प्रशासनाने दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

३० मार्च २०२६ रोजी घडलेल्या या स्फोटाने कराड तालुका हादरला होता. या पार्श्वभूमीवर मनविसेचे सातारा जिल्हा सचिव अमोल सुभाष कांबळे यांनी उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत सखोल चौकशीची मागणी केली होती.

कांबळे यांनी आपल्या निवेदनात काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. कंपनीने स्फोटाच्या अवघ्या आठ दिवसांपूर्वी ‘सेफ्टी ऑडिट’ पूर्ण केल्याचा दावा केला असताना, एवढा मोठा स्फोट कसा घडला, याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, कंपनीच्या आवारात बेकायदेशीर विहीर बुजवून त्यामध्ये घातक रसायनांचे ड्रम गाडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, सीसीटीव्ही फुटेज व फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी करून सत्य समोर आणावे आणि संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय तसेच पोलीस प्रशासनाला पत्र पाठवून ‘विशेष तपास पथकाद्वारे’ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या कारवाईमुळे संबंधित कंपनी व्यवस्थापन तसेच सेफ्टी ऑडिट करणाऱ्या यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *