दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; ६ गुन्हे उघड, ३.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी:- प्रतिनिधी
दहिवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटारसायकल, विहीर व बोरवेलवरील मोटारींच्या केबल चोरी तसेच घरफोडी करून सोन्याची चेन चोरणाऱ्या आरोपीला अटक करून एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख १५ हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैषाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे आपल्या पथकासह चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पिंगळी खुर्द येथील पोलीस पाटील महेश पोपट शिंदे यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार शिरवली येथील सागर पोपट चव्हाण याच्यावर संशय घेत त्याला ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने विविध ठिकाणी मोटारसायकल व केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून:
७५,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल
विहीर व बोरवेलवरील मोटारींच्या केबल (एकूण १,९५,२५० रुपये किंमत)
असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याशिवाय, पाचवड येथील घरफोडी प्रकरणात चोरीस गेलेली १ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन देखील आरोपीकडून जप्त करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खाडे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार रविंद्र खाडे, पोलीस नाईक स्वप्नील महामने, नितीन धुमाळ, तसेच पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे आणि पोलीस पाटील महेश शिंदे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

