म्हसवड येथे महिला दिन उत्साहात; कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
सुशील त्रिगुणे
म्हसवड : प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, सातारा शाखा म्हसवड यांच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला म्हसवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुजा सचिन विरकर, पंचायत समिती माणचे नूतन सभापती विक्रम शिंगाडे, उपनगराध्यक्षा श्रीदेवी निशांत पिसे, नगरसेविका चैताली शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी शमीमबानु तांबोळी, ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका मालन सावंत, कमल चव्हाण, सुशिला ढोबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मे महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या दिपांजली पतंगे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यात आला. विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला शिक्षक भगिनींचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपक्रमशील शिक्षिका सुशिला बनसोडे यांनी महिला दिनानिमित्त सुंदर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. म्हसवड मतदारसंघातील महिला शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी किरण बोराटे सर व बोराटे मॅडम यांनी साकारली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुजाता कुंभार यांनी मानले.
एकूणच, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

