महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६ ने सामाजिक कार्यकर्ते सचिन नवगण यांचा गौरव
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) शकील मुल्ला
समाजासाठी निस्वार्थ भावनेने सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६’ सोहळ्यात म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नवगण यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात विशेष ओळख असलेले सचिन नवगण यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विधाता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वारकऱ्यांना नाश्ता वाटप, आरोग्य शिबिरे, अंधश्रद्धा निर्मूलन मोहिमा, गरीब विद्यार्थ्यांना कपडे व शैक्षणिक साहित्य वितरण, रस्ता सुरक्षा जनजागृती तसेच पर्यावरण संवर्धन अशा विविध लोकहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
गरजू कुटुंबांना मदतीचा हात, युवकांना योग्य मार्गदर्शन आणि समाजप्रबोधनासाठी सातत्याने घेतलेली धडपड यामुळेच त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. ते विधाता सामाजिक संस्था, म्हसवड चे संस्थापक अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, आपत्तीग्रस्तांना सहाय्य आणि विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत.
या दिमाखदार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सिने अभिनेत्री रिया जोशी तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश विटकर यांच्या हस्ते सचिन नवगण यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना सचिन नवगण म्हणाले,
“हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या सहकाऱ्यांचा आणि समाजाचा आहे. समाजसेवा हीच खरी पूजा असून पुढेही अधिक जोमाने कार्य करत राहू.”
हा प्रेरणादायी सन्मान सोहळा पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, शिवाजीनगर, पुणे येथे उत्साहात व दिमाखात पार पडला. त्यांच्या या यशाबद्दल म्हसवड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

