म्हसवडमध्ये भाजपविरोधी मोर्चेबांधणीला वेग — जानकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार विरोधक!

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज –

म्हसवड प्रतिनिधी / अहमद मुल्ला

      म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची सरगर्मी दिवसेंदिवस वाढत असून, यंदा भाजपच्या विजयाच्या वाटचालीला आडकाठी घालण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपविरोधी सर्वच पक्ष, संघटना व स्थानिक पॅनलचे प्रमुख एकाच व्यासपीठावर येऊन एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

     अलीकडेच म्हसवड येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत माजी दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माण-खटाव विधानसभा अध्यक्ष अभयसिंह जगताप, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रा. कविता म्हेत्रे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, तसेच मनोज पोळ, बाळासाहेब काळे, बाबासाहेब माने, राहुल मंगरुळे, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, गणेश माने आदी स्थानिक नेते उपस्थित होते.

       या बैठकीत भाजपविरोधी राजकीय समीकरणांची आखणी करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशा प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग नोंदवला.

           विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, म्हसवड नगरपरिषदेची येणारी पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितपणे लढवण्याचा प्राथमिक निर्णय घेतला गेला आहे. विरोधकांनी यावेळी “भाजपला रोखण्यासाठी एकसंघता हाच मार्ग” असा नारा दिला.

      बैठकीदरम्यान नगरसेवक पदांवरील संभाव्य उमेदवार, पॅनल रचना, प्रभागनिहाय समन्वय, तसेच प्रचाराचे नियोजन या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. येत्या काही दिवसांत या आघाडीचा औपचारिक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

     म्हसवडमध्ये भाजपच्या अढळ मुळांना तडा देण्यासाठी ही विरोधकांची एकजूट निर्णायक ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *