भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांची एकजूट – विकास हाच आमचा अजेंडा : माजी मंत्री महादेव जानकर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादकअहमद मुल्ला

म्हसवड, प्रतिनिधी:
      आगामी म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व समविचारी पक्ष आणि गटांनी एकत्र येत एकजुटीचा नारा दिला असून “एकास एक उमेदवार” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या राजकीय घडामोडीची औपचारिक घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज म्हसवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

    या पत्रकार परिषदेला माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. कविता म्हेत्रे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, माजी नगराध्यक्ष महादेव मासाळ, अरविंद पिसे, तेजसिंह राजेमाने, अ‍ॅड. निसार काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

     पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की, ही निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी आहे. आम्ही सक्षम, स्वच्छ चारित्र्य आणि विकासाभिमुख उमेदवार जनतेसमोर आणू. म्हसवड शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे. लोकांनी जात, धर्म, पक्ष याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाला प्राधान्य द्यावे. आमच्या आघाडीचा एकमेव मुद्दा म्हणजे शहराच्या प्रगतीसाठी काम करणे. जनतेचा विश्वासघात कधीच करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

     यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले . गेल्या पंधरा वर्षांत नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले नाही, रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील नागरिकांना सुरक्षिततेचा अभाव जाणवतो. या वाईट प्रवृत्तीविरुद्ध आणि दुर्लक्षी प्रशासनाविरुद्ध ही आघाडी उभी करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. समविचारी पक्षांना सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी योग्य रणनिती आखली जाणार आहे.

    अनिल देसाई यांनी सांगितले की, लोकांच्या मनातील आघाडी उभी करून एकास एक अशी लढत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवून विकासाभिमुख प्रचारयंत्रणा उभारली जाणार आहे.

     प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या की, आम्ही जनतेच्या मनातील आघाडी करीत आहोत. सुरक्षित शहर, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक लढवली जाईल. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारे अशा मूलभूत समस्यांवर उपाययोजना करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ही निवडणूक ठोकशाहीच्या विरोधात लोकशाहीची लढाई असेल आणि आमच्या गावात आमचाच कारभार असेल.

   पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जानकर म्हणाले की, आमचा उमेदवार जिंकून येणारा, स्वच्छ चारित्र्याचा आणि विकासदृष्टी असणारा असेल. त्याचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *