एन. डी. स्टुडिओत चित्रिकरणासाठी ५० टक्के सवलत; निर्मात्यांना मोठा दिलासा
व्हिजन २४ तास न्यूज
गणेश तळेकर
मुंबई, प्रतिनिधी :
चित्रपट निर्मितीचा वाढता खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने कर्जत येथील एन. डी. स्टुडिओच्या विविध सुविधांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत तब्बल ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
या सवलतीचा लाभ चित्रिकरणासाठी उपलब्ध विविध लोकेशन्स, थीम पार्क प्रवेश शुल्क तसेच निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक व इतर मान्यवरांसाठीच्या निवासव्यवस्थेच्या शुल्कावर मिळणार आहे. त्यामुळे निर्मात्यांच्या चित्रपट निर्मिती खर्चात मोठी बचत होणार असून, एन. डी. स्टुडिओमध्ये अधिकाधिक चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि दृकश्राव्य निर्मितींचे चित्रिकरण होण्यास चालना मिळणार आहे.
एन. डी. स्टुडिओमध्ये मराठीसह हिंदी आणि अन्य भाषांतील चित्रपट व विविध दृकश्राव्य निर्मितींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि वैविध्यपूर्ण चित्रिकरण स्थळे उपलब्ध आहेत. या सुविधांचा अधिकाधिक वापर व्हावा आणि निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञांना अनुकूल वातावरण मिळावे, या उद्देशाने सवलतीचा निर्णय घेण्यात आला आहे.
चित्रपट निर्मितीला चालना देण्यासोबतच महाराष्ट्रात देशभरातील निर्मात्यांना आकर्षित करणे, स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि चित्रपट पर्यटनाला प्रोत्साहन देणे, हा या निर्णयामागील व्यापक उद्देश आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एन. डी. स्टुडिओचा केवळ चित्रिकरणासाठी नव्हे, तर चित्रपट निर्मिती, मनोरंजन आणि सांस्कृतिक पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विकास करण्याबाबतही चर्चा झाली. स्टुडिओतील पायाभूत सुविधा, चित्रिकरण स्थळे, निवासव्यवस्था आणि थीम पार्कचा प्रभावी वापर करण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे संकेत देण्यात आले.
बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असलेल्या या सवलतीमुळे एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा असून, महाराष्ट्राला देशातील प्रमुख चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

