महाराष्ट्र सरकारने धनगड ची धनगर अशी दुरुस्तीची शिफारस केंद्रसरकार कडे करावी या मागणी करिता धनगर समाजाचेआमरण उपोषण
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
महाराष्ट्रात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला राज्य घटनेने आदीवासी (एस.टी.) चे आरक्षण दिले आहे, मात्र शासन धनगर व धनगड या शब्दाचा भेद करून धनगर समाजाची आजवर दिशाभुल करीत आले आहे, यापुढे शासनाने धनगर समाजाची दिशाभुल न करता या समाजाला घटनेप्रमाणे एस.टी. आरक्षण मिळण्याकरीता धनगड ची धनगर अशी दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी या प्रमुख मागणी सह राज्यातील सर्व धनगर समाजाच्या न्याय व हक्काच्या मागणी साठी केलेल्या सर्व आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करुन एस. टी.चे सर्टिफिकेट वितरीत करावे या मागणी करीता धनगर समाजाच्या उत्तम विरकर, गणेश केसरकर, प्रकाश हुलवान या ३ युवकांनी म्हसवड नगर पालिकेसमोर दि.२७ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे.
राज्यात धनगर समाजाच्या मतांवर अनेकांनी सत्तेचा लाभ घेतला आहे, मात्र गत ७ दशका पासुन हा समाज ज्या आरक्षणाचा हक्कदार आहे त्या एस.टी. आरक्षणाचा लाभ आजवर या समाजाला दिला गेला नाही, ज्या – ज्यावेळी या समाजाने एस.टी.आरक्षणाची मागणी केली त्या त्यावेळी शासनाने अभ्यासाच्या नावाखाली आजवर वेळ मारून नेण्याचे काम केले आहे,
आजवर फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाचे गाजर दाखवुन या समाजाची दिशाभुल करण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे. पण यापुढे हा धनगर समाज या नेत्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही, जोपर्यंत धनगड ची धनगर अशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्धार या उपोषकर्त्यांनी केला यासाठी त्यांनी गत ५ दिवसांपासुन म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा दर्शिवला आहे तसेच रासप चे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बबनदादा विरकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रमोद गावडे,भाजप माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जगन्नाथ विरकर ,विठ्ठल सजगणे ,विलास रुपनवर अशोक राजगे ,बाळासाहेब माने अशा अनेक मान्यवरांनी भेट देत त्यांच्या भुमीकेचे समर्थन ही केले आहे.


