म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन गुन्हे उघड, दोन आरोपी जेरबंद!
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि. २१ ऑक्टोबर :
वरकुटे मलवडी (ता. माण) येथील सोलर प्रकल्पातील केबल चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, दोन्ही गुन्ह्यांतील एकूण २ लाख ५८ हजार रुपये किमतीची केबल वायर जप्त करण्यात आली आहे.
वरकुटे मलवडी येथील आवाडा सोलर प्रा. लि. कंपनीच्या सोलर पॅनल परिसरातील स्ट्रिंग केबल व इतर वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी कंपनीच्या सुपरवायझरने दिलेल्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच याच कलमान्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२०२५ मधील गुन्ह्याचाही तपास सुरू होता. सुरुवातीला आरोपींचा शोध घेऊनही त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता.
सोलर प्रकल्प परिसरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.
या पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानंतर आदर्श दत्तात्रय आटपाडकर (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि अजय भीमराव पवार (रा. सांजा, ता. जि. धाराशिव) यांना अनुक्रमे सोलापूर व धाराशिव येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता, दोघांनी संगनमताने केबल वायर चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली २ लाख ५८ हजार रुपये किमतीची केबल वायर हस्तगत करून जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे, पोलीस अंमलदार अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, प्रकाश इंदलकर, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, संतोष काळे, सतीश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारे, पोलीस अंमलदार सचिन साळुंखे, सनी आवटे, अमित सपकाळ, ओंकार यादव, मोहन पवार आणि संजय जाधव यांनी सहभाग घेतला.

