गॅस गाडीतील ३५ हजारांची रोकड हिसकावली; दहिवडी पोलिसांकडून विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी :प्रतिनिधी
गॅस विक्रीतून मिळालेली ३५ हजार १५० रुपयांची रोकड चालकाच्या खिशातून हिसकावून उसाच्या शेतात पळून गेलेल्या इसमाचा दहिवडी पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ११ हजार रुपयांची रोकड हस्तगत केली असून, तपासादरम्यान हा गुन्हा एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.४० वाजता एचपी गॅस एजन्सीचे महिंद्रा पिकअप वाहन (क्रमांक एमएच १४ सीपी ७५३३) घेऊन चालक महिपती ज्ञानू जाधव हे कातरखटाव ते दहिवडी मार्गाने दहिवडीकडे येत होते. यावेळी पिंगळी बुद्रुक गावच्या हद्दीत पटेल गॅरेजजवळ गाडीतून प्रवास करणाऱ्या अनोळखी मुलाने उलटी येत असल्याचे सांगून वाहन थांबविण्यास सांगितले.
वाहन थांबताच त्याने चालकाच्या शर्टाच्या वरच्या खिशात हात घालून गॅस विक्रीतून जमा झालेली ३५ हजार १५० रुपयांची रोकड हिसकावून घेतली आणि रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात पळ काढला. चालकाने त्याचा शोध घेतला; मात्र तो सापडला नाही. यानंतर गॅस एजन्सीचे मालक अभय ज्ञानेश्वर तोडकर, रा. दहिवडी, ता. माण, जि. सातारा यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा
गुन्ह्याच्या तपासादरम्यान दहिवडी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि चालकाने दिलेले आरोपीचे वर्णन यांच्या आधारे शोधमोहीम राबवली. या तपासातून संबंधित गुन्हा एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेल्या रकमेपैकी ११ हजार रुपये हस्तगत केले आहेत.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहायक पोलीस फौजदार चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप, बापू खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे आणि आसिफ नदाफ यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस फौजदार चंद्रहार खाडे करीत आहेत.

