सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करा! श्रीरंग काटेकर यांची शासनाकडे मागणी;
व्हिजन २४ तास न्यूज
श्रीरंग काटेकर
सातारा | प्रतिनिधी
जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी शासनाने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून स्वतंत्र कायदा करावा, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग काटेकर यांनी केली. सातारा येथील हॉटेल सन इनमध्ये जनहक्क क्रांती मंचाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ५० सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात सामाजिक कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना अनेक कार्यकर्त्यांना हल्ले आणि विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे काटेकर यांनी स्पष्ट केले.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्यांची संघटनशक्ती समाजोपयोगी कामांसाठी एकत्र आणण्याच्या उद्देशाने जनहक्क क्रांती मंचाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांना दिशा देणे, त्यांना न्याय मिळवून देणे, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकशक्तीच्या बळावर अपप्रवृत्तींविरोधात लढा देणे, ही मंचाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच शासकीय स्तरावर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यावर भर दिला. नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे आणि लोकहिताची कामे मार्गी लावण्यासाठी मंचाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवानिवृत्त सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील भस्मे यांनी माहिती अधिकार कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसनही त्यांनी केले. माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शंकर माळवदे यांनी शासकीय कार्यालयांतील दप्तरदिरंगाईमुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहत असून, त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे सांगितले. प्रशासकीय पातळीवरील अडथळे दूर करून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रभावी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा शहरात सामाजिक कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला. जनतेचे प्रश्न सोडविणे, रखडलेली विकासकामे मार्गी लावणे, शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकहिताला प्राधान्य देणे, यावर कार्यशाळेत सविस्तर मंथन करण्यात आले. संघटित शक्तीच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींविरोधात लढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केले, तर आभार शिवाजी जाधव यांनी मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे, महारुद्र तिकुंडे, शंकर माळवदे, शिवाजी जाधव, प्रणव सावंत, गणेश आहिवळे, सुमित नाईक, भरतराव रावळ, कपिल राऊत, तन्मय नवले, गणेश वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

