कोळी समाजाच्या जात वैधता प्रश्नावर महासंघ आक्रमक शासन निर्णय तातडीने जाहीर करा; सातारा जिल्हाधिकाऱ्यांना

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
सातारा, :प्रतिनिधी
अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अॅड. चेतनदादा पाटील यांच्या सूचनेनुसार हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब कोळी, जिल्हाध्यक्ष अनिल केळगणे, युवाध्यक्ष तुषार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा श्रीकुमारी कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीत कोळी समाजाच्या जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रक्तसंबंधातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतही महत्त्वपूर्ण भूमिका निश्चित करण्यात आली होती. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित शासन परिपत्रक अद्याप जारी झाले नसल्याने समाजातील हजारो नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत महासंघाने व्यक्त केली.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री व संबंधित विभागांनी तातडीने शासन निर्णय जाहीर करून समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

आण्णासाहेब कोळी यांनी सांगितले की, कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी महासंघाचा लढा सुरूच राहणार असून शासनाने सकारात्मक भूमिका घेत त्वरित निर्णय घेणे आवश्यक आहे.

चौकट

जात वैधता प्रक्रियेला गती देण्याची मागणी

कोळी महासंघाच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 20 ऑक्टोबर 2023 च्या बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, जात व जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुलभ नियमावली जाहीर करावी आणि संबंधित शासन परिपत्रक त्वरीत काढावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *