दहिवडी पोलिसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई — सहा ठिकाणी छापे, सहा आरोपींवर गुन्हे दाखल
व्हिजन २४ तास न्यूजसंपादक अहमद मुल्ला
दहिवडी (प्रतिनिधी) –
माण तालुक्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी व विदेशी दारू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सलग तीन दिवसांत विविध गावांमध्ये छापे टाकले. या मोहिमेत सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण ₹६,३४० रुपयांचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
८ ऑक्टोबर रोजी शेवरी (ता. माण) येथे उषाताई साहेबराव चव्हाण (वय ५२) ही महिला आपल्या घराच्या आडोशाला बिगर परवाना देशी दारू विक्री करत असताना पोलिसांच्या हाती लागली.
त्याच दिवशी शिंगणापूर येथे बबन विष्णू चव्हाण (वय ५८) हा बेकायदा देशी दारू साठवून विक्रीसाठी ठेवलेला आढळला.
९ ऑक्टोबर रोजी कुळकजाई येथे संतोष आण्णा मदने (वय ४०, रा. राजापूर) हा गणेश खिंडी मार्गावरील बंद ढाब्याच्या आडोशाला देशी व विदेशी दारू साठवताना पोलिसांनी पकडला.
त्याच दिवशी मलवडी येथे उमेश रघुनाथ माने (वय ३३) हा पत्र्याच्या शेडमागे बेकायदा दारू विक्रीसाठी ठेवलेली स्थितीत आढळला.
१० ऑक्टोबर रोजी लोधवडे येथे हणमंत रामचंद्र अवघडे (वय ३८) हा आपल्या घराच्या पाठीमागे देशी दारू बाळगून विक्रीसाठी तयार बसलेला सापडला.
त्याच दिवशी बिजवडी येथे माऊली हॉटेलच्या मागे दत्तात्रय अरुण शिंदे (वय २९, रा. लिबखोरी) हा इसम उघड्यावर दारू विकताना पोलिसांच्या ताब्यात आला.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या छाप्यात कॉ. गंगाधर कर्चे, वैभव ओंबासे, संतोष वीरकर आणि अनिल खाडे या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
सर्व आरोपींवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास दहिवडी पोलिसांकडून सुरू आहे.

