म्हसवड नगराध्यक्ष पदासाठी महिला इच्छुकांची लगबग — स्थानिक सक्षम नेतृत्वाकडे नागरिकांचा कल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड  :प्रतिनिधी

म्हसवड नगराध्यक्ष पद महिलांसाठी खुल्या गटात आरक्षित झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. या पदासाठी महिला उमेदवारांची मोठी रांग लागली असून, अनेक पुरुष नेत्यांनी “मी नाही तर माझी कारभारीण” अशी भूमिका घेत निवडणुकीच्या रणांगणात प्रवेश करण्याची तयारी केली आहे.

राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे विश्वासू कार्यकर्ते व महायुती-भाजप गटातील महिला उमेदवारांचा प्रभाव लक्षणीय आहे. आगामी निवडणुकीत स्थानिक, सक्षम, नागरिकांशी निगडित समस्यांची जाण असणारे नेतृत्व पुढे यावे, अशी शहरवासीयांची स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🟠 भाजप-महायुती गटातील इच्छुक महिला उमेदवारांची चढाओढ

मंत्री जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुनील पोरे यांच्या पत्नी सुवर्णा पोरे या स्थानिक उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. पोरे कुटुंबियांची जयकुमार गोरे यांच्याशी असलेली निष्ठा, तसेच कोरोना काळापासून आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा यांच्या पत्नी अथवा सुनबाई यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष रवींद्र वीरकर आपल्या पत्नी मनीषा वीरकर यांच्यासाठी तिकीट मिळविण्याच्या तयारीत आहेत.

मंत्री गोरे यांचे खंदे समर्थक शंकर वीरकर यांच्या पत्नी कांताताई वीरकर यांच्याही उमेदवारीसाठी सक्रिय हालचाली सुरू आहेत. जुन्या पिढीतील माजी नगरसेवक व श्री नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा (वीरकर) खोत यांच्या सुनबाई व प्राध्यापिका संध्या खोत ह्याही इच्छुकांच्या रांगेत आहेत.

माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांच्या पत्नी राजश्री दोशी यांच्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच मंत्री गोरे यांच्या निकटवर्तीय माजी नगराध्यक्षा वैशाली लोखंडे या देखील पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

म्हसवड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अकील काझी, जे मंत्री जयकुमार गोरे यांचे अत्यंत निष्ठावंत व विश्वासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत, हेही आपल्या सौभाग्यवतीला तिकीट मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. स्थानिक पातळीवर त्यांची चांगली पकड आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रभाव असल्याने त्यांची दावेदारीही चर्चेत आहे.

🔵 महायुतीतील मित्र पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवारही रिंगणात

महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गटातील मित्र पक्ष) चे माजी नगरसेवक व माण तालुका अध्यक्ष युवराज सूर्यवंशी यांनी पत्नी स्नेहल सूर्यवंशी यांच्यासाठी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून प्रा. कविता म्हेत्रे तसेच भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने या दोन महिला नेत्यांनीही आपली उमेदवारी निश्चित करण्याची चाचपणी सुरू केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनीदेखील माण तालुक्यात दौरे सुरू केले असल्याने त्यांचा पक्ष कोणत्या पॅनेलबरोबर जाणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

🟡 स्थानिक नेतृत्वाकडे नागरिकांचा कल

म्हसवड शहरातील नागरिकांमध्ये स्पष्ट मागणी आहे की, “नगराध्यक्षपदासाठी स्थानिक, सर्वसामावेशक, निस्वार्थी आणि कृतिशील नेतृत्वालाच संधी मिळावी.” शहरातील समस्यांची अचूक जाण असणाऱ्या उमेदवाराकडेच नागरिकांचा कल झुकत आहे.

मंत्री जयकुमार गोरे यावेळी स्थानिक नेतृत्वाला प्राधान्य देतील अशी प्रबळ अपेक्षा नागरिक आणि कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. भाजपचे पॅनेल रिंगणात ठेवताना महायुतीतील मित्रपक्षांचा सहभाग कितपत राहतो आणि अखेरीस कोणत्या महिला उमेदवाराला पक्षशक्तीची साथ मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या सोडती जाहीर झाल्या असल्या तरी प्रभागातील आरक्षणाच्या सोडती बुधवार दि.८ रोजी होणार आहेत यानंतर निवडणुकीच्या रंगीत घडामोडींना वेग येईल.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *