निकृष्ट दर्जाच्या पुलामुळे जीवितहानीचा धोका; ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी):
शिवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीवरील सर्व्हिस रोडचा पूल हा ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आला आहे. आज पुलाची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की, कधीही मोठा अपघात होऊन नागरिकांचा बळी जाऊ शकतो. तरीसुद्धा संबंधित ठेकेदार व अधिकारी बेदरकारपणे डोळेझाक करत आहेत.
सचिन नारायणराव जाधव यांनी उंब्रज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुलाबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकारी हलत नाहीत. २६ जून रोजी NHAI कडे लेखी तक्रार केली होती. ८ जुलै रोजी पत्रव्यवहार करून कंत्राटदार कंपनीला तपासणी व अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तीन महिने उलटून गेले तरी ठेकेदार व अधिकारी हातावर हात ठेवून बसले आहेत.
पालकमंत्र्यांनी स्वतः बैठकीत तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले असतानाही त्याकडेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. यावरून ठेकेदार आणि NHAI अधिकाऱ्यांचे संगनमत व भ्रष्टाचार ठळकपणे उघड होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
“पूल कोसळून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल करत शिवसेना (शिंदे गट) ने तात्काळ गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सातारा आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आली असून, आता कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.
निवेदनावर सचिन नारायण जाधव, अतुल शिवाजीराव पाटील, राजेंद्र आनंदराव चव्हाण, सुरज सुधाकर खामकर, दत्तात्रय बाबासाहेब जाधव, रवींद्र मानसिंग हजारे, विक्रम संभाजी वाघमारे, रोहन साहेबराव कदम, विठ्ठल जाधव, दत्ता फुके, आदिंच्या सह्या आहेत

