गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर करण्याची मनसेची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड/प्रतिनिधी
कराड व मलकापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे, खड्डे व वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, कराड व मलकापूर नगरपरिषद तसेच कराड नगरपरिषद प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यापूर्वी १३ ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या बैठकीत विविध गणेश मंडळांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या होत्या. त्या प्रमुख मागण्या अशा आहेत :
कराड शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरणे.
विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे दूर करणे.
आगाशिवनगर व मलकापूर परिसरातील रस्त्यांवरील डिव्हायडर सुरक्षित करणे.
कोल्हापूर नाक्यापासून कराड शहराकडे जाणारा मार्ग खुला ठेवून रुंदीकरण करणे.
विसर्जन मार्गावरील तारा, खड्डे यांची सुरक्षितता करणे.
चावडी चौकात नगरपरिषदेकडून उभारण्यात येणारा स्वागत मंडप यंदा न उभारणे.
विसर्जन मार्गावर दोन अॅम्बुलन्स उपलब्ध ठेवणे.
स्वागत कक्ष चावडी चौकातून प्रतिसंगम घाटावर हलवणे.
शिंगण यांनी प्रशासनावर आरोप केला की, “गणेश मंडळांवर मात्र विविध बंधने लादली जात आहेत, परंतु प्रशासन आपली जबाबदारी पार पाडत नाही. खड्डेमय रस्ते, महामार्गावरील कोंडी व विसर्जन मार्गावरील अडचणींमुळे गणेशभक्त व नागरिक त्रस्त झाले आहेत.”
मनसेने स्पष्ट केले आहे की, वरील कामे गणेश विसर्जनापूर्वी पूर्ण न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे जाहीर आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात येईल.
📍 कराड व मलकापूरमधील गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी व सोयीसाठी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेकडून होत आहे.
–

