म्हसवड शहरात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी
आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा अभियानाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड शहरात आज ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. श्री. ना. जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मोठ्या जल्लोषात काढण्यात आली. रॅलीत महिला संघटना, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, तसेच शहरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, महिलांची लक्षणीय उपस्थिती रॅलीचे आकर्षण ठरली.
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा देत सहभागीनी देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला. हातातील राष्ट्रीय ध्वज, आणि देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या रंगात रंगून गेले.
या प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ. सोनिया गोरे, नितीन दोशी, डॉ. प्रमोद गावडे, भाजप पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखावा, तसेच हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.
रॅलीची सांगता शहरातील मुख्य चौकात राष्ट्रगीताने करण्यात आली. शहरवासीयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही तिरंगा रॅली अविस्मरणीय ठरली.

