सातारा जिल्ह्यात काही भागात अचानक ‘सोनिक बूम’चा आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील म्हसवड,दहिवडी, खटाव माळशिरस शेणवडी, पळशी, कारखेल परिसरात गुरुवारी सकाळी दोन वेळा आलेल्या प्रचंड स्फोटासारख्या गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे व दहशतिचे वातावरण निर्माण झाले. हा आवाज सकाळी सुमारे ९:०० वाजता व १०:१६ वाजता असे दोन वेळा आल्याने नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण पसरले
सदर आवाज इतका तीव्र होता की अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा खडखडल्या. काही नागरिकांनी हे भूकंपाचे हलके हादरे असावेत अशीही शंका व्यक्त केली. सोशल मीडियावर या आवाजाबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. अनेकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
सोनिक बूमची शक्यता
प्राथमिक माहितीनुसार, हा आवाज भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाच्या वेगामुळे निर्माण झालेला सोनिक बूम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशिक्षणाच्या उद्देशाने लढाऊ विमानांनी उड्डाण केल्यावर, ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने जाताना अशा प्रकारचा आवाज निर्माण होतो, यास ‘सोनिक बूम’ असे म्हणतात.
नुकसान नाही, चौकशी सुरू
या आवाजामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. प्रशासन आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे – सपोनि अक्षय सोनवणे
म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणतीही पुष्टी न झालेली माहिती पसरवू नये, असे आवाहन केले आहे. अधिकृत माहिती मिळताच ती प्रसिद्ध केली जाईल, असेही सांगण्यात आले.
📰 सोनिक बूम ही नैसर्गिक आपत्ती नसून, ती लढाऊ विमानाच्या उड्डाणाशी संबंधित असते. त्यामुळे घाबरून जाऊ नये.

