योगासाठी जात-पंथ नाही, सकारात्मक विचार आवश्यक – योग अभ्यासिका सरिता थोरात यांचे मत
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
सातारा / कराड – प्रतिनिधी राहुल पवार
“योग करण्यासाठी कोणतीही जात, पंथ अथवा धर्म लागत नाही, तर केवळ सकारात्मक विचारांची गरज आहे,” असे प्रतिपादन योग अभ्यासिका सरिता थोरात यांनी केले.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आयोजित ऑनलाईन योग क्लास उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी, गृहिणी तसेच जेष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कोविड-१९ महामारीच्या काळात संपूर्ण जगाला योगाचे महत्त्व नव्याने पटले. योग हा भारतीय परंपरेचा प्राचीन वारसा असून, शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल राखण्याचे कार्य योग करत असतो. योगामुळे मन:शांती, आरोग्य, आत्मचिंतन, प्राणायाम यामुळे शरीरात सकारात्मक बदल घडतात. नियमित सूर्यनमस्काराने अनेक आजार टाळता येतात, मानसिक तणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार मनातून निघून जातात. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आयुष्यात आत्मिक समाधान मिळते, असेही त्यांनी सांगितले.
सरिता थोरात यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन योग अभ्यास क्लासला दररोज सकाळी ८ ते १० या वेळेत चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय दिवसभरही इच्छेनुसार वेळ ठरवून योग मार्गदर्शन दिले जाते.
या प्रसंगी दिपाली पवार या गृहिणीने अनुभव सांगताना म्हटले की, “योगामुळे माझं वजन कमी झालं असून, मानसिक तणावही आता जाणवत नाही. नियमित योग केल्यामुळे माझे आरोग्य चांगले राहते.”
कार्यक्रमात आकांक्षा पाटील, अर्चना पाटील, प्रज्ञा पाटील, सुहास चव्हाण यांच्यासह अनेक योग साधक युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
योगाच्या नियमित सरावातून उत्तम आरोग्य, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली साध्य होऊ शकते, हेच या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.